‼️‘बुके गँग’ : विकासाला खीळ ‼️
साहेब’ आले, ‘बुके गँग’ सक्रिय! जिल्ह्याचा विकास सोडा, आधी केक कापा !
साहेब’ आले, ‘बुके गँग’ सक्रिय! जिल्ह्याचा विकास सोडा, आधी फोटो काढा !
महाराष्ट्र,अकोला : राज्यात आता एक नवीनच ‘संस्कृती’ रुढ झाली आहे, ती म्हणजे ‘बुके संस्कृती’. कोणत्याही वरिष्ठ अधिकाऱ्याची बदली असो, मग तो पोलीस अधिकारी असो, जिल्हाधिकारी असो किंवा आरोग्य विभागाचा प्रमुख असो, त्याच्या नेमणुकीनंतर लगेचच ‘बुके गँग’ सक्रिय होते. ही गँग म्हणजे राजकीय नेते, त्यांचे चमचे आणि स्वार्थी मंडळींचा एक गट जो कामापेक्षा फोटो, केक आणि प्रदर्शनाला जास्त महत्त्व देतो.
ज्या क्षणी नवा अधिकारी जिल्ह्यात दाखल होतो, त्या क्षणापासूनच त्याचा पाय रोवू दिला जात नाही. राजकीय नेते सर्वात आधी बुके घेऊन स्वागतासाठी हजर होतात. पाठोपाठ त्यांचे चेले, चमचे आणि कार्यकर्त्यांची फौज बुके घेऊन लाईन लावते. बुके देणे हा आता फक्त स्वागताचा भाग राहिलेला नाही, तर ‘आमचे साहेब आले’ हे दाखवण्याचं ते एक माध्यम बनलं आहे.
या दिखाव्यामध्ये आता आणखी एक नवीन भर पडली आहे, ती म्हणजे केक कापण्याची आणि वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्याची परंपरा. अधिकाऱ्याला कामाची जाणीव करून देण्याऐवजी, त्यांच्या वाढदिवसाच्या पार्ट्या आयोजित करून, केक कापून त्यांच्यासोबत सेल्फी काढले जातात. अधिकारी ज्या कामासाठी नेमले जातात, त्या कामाचे उद्दिष्टच बाजूला राहते आणि फक्त गोड बोलून, केक कापून वातावरण खेळीमेळीचे बनवण्याचा प्रयत्न केला जातो.
या बुके देण्याच्या आणि सेल्फी काढण्याच्या मागे एक मोठा स्वार्थ दडलेला असतो. बुके दिल्यानंतर अधिकाऱ्यासोबत एक फोटो काढला जातो. तो फोटो सोशल मीडियावर व्हायरल केला जातो, ‘साहेब आपलेच आहेत’ असा संदेश दिला जातो. या दिखाव्यामुळे, अधिकाऱ्याला काम करण्यासाठी वेळच मिळत नाही. ज्या उद्देशाने तो अधिकारी त्या पदावर आला आहे, ज्यासाठी त्याची नियुक्ती झाली आहे, तो उद्देश बाजूला राहतो.
या बुके संस्कृतीमधूनच पुढे ‘सेटिंग’ चे प्रकार सुरू होतात. काही अधिकारी या गोड बोलण्याला बळी पडतात आणि काम करण्याऐवजी सेटिंगमध्ये अडकतात. तर काही अधिकारी जे कठोरपणे काम करू इच्छितात, त्यांना हे ‘बुके बहाद्दर’ काम करू देत नाहीत. जनहिताची कामे मागे पडतात आणि स्वार्थी लोकांची कामे मार्गी लागतात.
ज्या कामांसाठी हे अधिकारी नेमले जातात, त्यांची त्यांना जाणीव करून देणे हे जनतेचे कर्तव्य आहे. एखाद्या अधिकाऱ्याने कामात हलगर्जीपणा केल्यास त्याला बुके देण्याऐवजी, रखडलेल्या विकास कामांची यादी, प्रलंबित प्रकरणांची फाईल आणि जनतेच्या समस्यांचे निवेदन देऊन धारेवर धरण्याची वेळ आली आहे. ही बुके आणि केक देणारी ‘गँग’ ही एकप्रकारे कामाच्या आड येणारी ‘सिस्टम’ आहे, जी वेळीच मोडून काढायला हवी.
जनतेचा आक्रोश : बुके नको, काम दाखवा !
एकीकडे शासन पारदर्शक आणि वेगवान प्रशासनाचे नारे देत असताना, दुसरीकडे ही ‘बुके गँग’ प्रशासनाची गती थांबवत आहे. बुके संस्कृतीमुळे प्रामाणिक आणि कार्यक्षम अधिकारी हवालदिल झाले आहेत. जनतेलाही आता प्रश्न पडला आहे की, विकासासाठी नेमलेले अधिकारी हे फोटो सेशनसाठी आले आहेत की जनतेची कामे करण्यासाठी ?
या ‘बुके गँग’ला वेळीच लगाम घालण्याची गरज आहे. ‘बुके’ आणि ‘केक’ ऐवजी ‘बुक’ (पुस्तक) आणि ‘फाइल’ देण्याची संस्कृती रुळली तरच अधिकारी आणि कार्यकर्ते खऱ्या अर्थाने कामाला लागतील. अन्यथा, बुके आणि सेल्फीच्या गर्दीत जनतेची कामे हरवून जातील, यात शंका नाही.
बुके संस्कृती’: वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या स्वागताची ‘नवी’ परंपरा, कामापेक्षा प्रदर्शन महत्त्वाचे.
राजकीय हस्तक्षेप : राजकीय नेते, कार्यकर्ते आणि त्यांच्या चमच्यांची ‘बुके गँग’ अधिकार्यांच्या कामात अडथळा ठरते.
केक संस्कृती आणि रखडलेली विकास कामे'














