नवीन बस स्थानकावर महर्षी वाल्मीकी महाराज जयंती उत्साहात साजरी; 'सत्य, न्याय आणि माणुसकी'च्या विचारांचे स्मरण
महाराष्ट्र,अकोला, दि. ७ ऑक्टोबर :अखिल भारतीय वाल्मीकी महापंचायतच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यावर्षीही अकोल्यातील नवीन बस स्थानक येथे महर्षी वाल्मीकी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
याप्रसंगी एसटी महामंडळाचे वाहतूक नियंत्रक शैलेंद्रजी तिवारी यांच्या हस्ते महर्षी वाल्मीकी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले. तसेच उपस्थित अन्य मान्यवरांनीही प्रतिमेचे पूजन केले आणि बस स्थानक परिसरात पेढे वाटप करण्यात आले.
यावेळी अखिल भारतीय वाल्मीकी महापंचायतचे राष्ट्रीय प्रवक्ते सचिन चावरे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. ते म्हणाले की, वाल्मीकि जयंती हा दिवस महर्षींना आदरांजली अर्पण करण्यासाठी आणि त्यांच्या विचारांचे व शिकवणींचे पालन करण्याचा उत्तम प्रसंग आहे. महर्षी वाल्मीकी यांनी आपल्या लेखनातून सत्य, न्याय आणि माणुसकीचे महत्त्व अधोरेखित केले. त्यांच्या विचारांमुळे आजही लाखो लोकांना प्रेरणा मिळते, असे प्रतिपादन त्यांनी केले.
वाल्मीकि समाजाचे जेष्ठ मुन्ना भगत नकवाल यांनी वाहतूक नियंत्रक शैलेंद्रजी तिवारी यांचे स्वागत केले.
या कार्यक्रमाला स्वामी विवेकानंद स्वास्थ युवा प्रसारक मंडळाचे अध्यक्ष ऋषिकेश सातव, उपाध्यक्ष गणेश ठाकरे यांच्यासह स्वप्निल अहिर, सुशील जांभळे, आकाश सावते आदी प्रामुख्याने उपस्थित होते. हा कार्यक्रम अखिल भारतीय वाल्मीकी महापंचायत शाखा अकोला च्या वतीने आयोजित करण्यात आला होता. 

